बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना सातारा भूषण पुरस्कार जाहीर

Satara Bhushan Award announced to BVG Chairman Hanmantrao Gaikwad

संवाददाता ब्रिजेश बडगुजर (सातारा):

“रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट” व सातारकर नागरिकांच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा “सातारा भूषण पुरस्कार” बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वा. राजवाडा परिसरातील श्री समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख संघटक डॉ. अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे गायकवाड यांचा जन्म झाला. बालवयात त्यांच्या वडिलांचे निधन झाले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते इंजिनिअर झाले. सन १९९४ साली टाटा मोटर्स,पुणे येथे त्यांनी ट्रेनी इंजिनियर म्हणून नोकरीला सुरवात केली.याच दरम्यान सातारा परिसरातील युवक रोजगार मिळावा या उद्देशाने गायकवाड यांना सातत्याने भेटत होते. युवकांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी सन १९९७ भारत विकास ग्रुपची (बीव्हीजी) स्थापना केली. संस्थेमार्फत ” हाऊस-किपींग” चे काम करण्यास सुरवात केली,याच हाऊस-किपींगच्या कामाचे त्यांनी इंडस्ट्रीत रूपांतर केले. या इंडस्ट्रीचा त्यांनी देश-विदेशात विस्तार केला. राष्‍ट्रपती भवन,संसद,पंतप्रधान निवासस्‍थान,अयोध्येतील राम मंदिर, अमृतसर गुरूद्वारा,श्री सिध्‍दीविनायक मंदिर,दिल्‍ली,मुंबई,बेंगलोर येथील विमानतळे अशा अनेक ठिकाणी गायकवाड यांनी १ लाखा पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना रोजगाराची संधी दिली आहे.

हाऊस-किपींग इंडस्ट्री बरोबरच गायकवाड यांनी सेवा व्यवस्थापन क्षेत्र,कृषी व आरोग्य क्षेत्रातही त्यांचे योगदान ठळक केले आहे. महाराष्ट्र, जम्मू काश्मीर अशा विविध राज्यात बीव्हीजीद्वारे १०८ रुग्ण वाहिकांचे व्यवस्थापन केले जाते. या सेवेचा १ कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीव्हीजी ॲग्रोटेक नावाची कंपनी शेतकऱ्यांसाठी काम करते.

कंपनीची उत्पादने वापरुन हजारो शेतकरी सेंद्रिय शेतमालाचे भरघोस उत्पादन घेत आहेत. त्याचबरोबर शेतमाल प्रक्रीया उद्योगाला चालना देण्यासाठी सातारा येथे मेगाफुड पार्क उभारण्यात आले आहे. मेगाफुड पार्कद्वारे “शेतकरी उद्योजक” ही संकल्पना खऱ्या अर्थाने अस्तित्वात येण्यास सुरवात झाली आहे.

मानवी आरोग्य अबाधीत राखण्यासाठी बीव्हीजी लाईफ सायन्सेस या कंपनीद्वारे नॅनो तंत्रज्ञानावर अधारीत अनेक हर्बल औषधांचे निर्माण केले जाते. त्यातील शत प्लस औषध करोना काळात रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी माईलस्टोन औषध ठरले होते.

समाजाप्रती गायकवाड यांनी दिलेले योगदान युवकांपर्यंत पोहचवण्यासाठी अभ्यासक्रमाच्या पुस्तकातही त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आला आहे.